चक्का
ह्या राखीपौर्णिमेला मुलीने हट्ट धरला की नारळी भात नको. मग आम्रखंड पुरी असा बेत करायचा ठरला. आम्रखंड म्हणजे अर्थात चितळें असं समीकरण कित्येक वर्षं झाले आहे.
जेवणानंतर मुलीने सहज विचारलं की हे कशापासून बनवतात आणि माझ्या लक्षात आलं की अरेच्चा आपण तर घरी मुली समोर चक्का बनवलाच नाही कधी .
तिला सगळी प्रोसेस समजावून सांगितली तेव्हा मन नकळतपणे मोठी आईच्या (आई ची आई ) स्वयंपाक घरात शिरले .
लहानपणी श्रावण सुरु झाला की चंगळ असायची. मोठी आईकडे रोज काहीतरी नवीन पदार्थ बनायचा. तसं श्रावण महिन्याचं फक्त निमित्त होतं, ती वर्षभर काही ना काही कारणाने मस्त मस्त पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घालत असे .ते पण इतक्या प्रेमाने आणि कौतुकाने .
घरातलीच 15-20 मंडळी, त्याव्यतिरिक्त येणारे आप्तेष्ट, मैत्रिणी, आणि नियमित पणे साधू महाराजांची सेवा म्हणून पोचते केलेले डब्बे. कधी पुरणपोळी, तर कधी घरी दही लावून चक्का बनवून केलेलं श्रीखंड ,कधी मसाले भात, तर कधी विविध लाडू आणि वड्या ,कधी कोबीच्या करंज्या तर कधी झुणका. कितीही लोकांचा स्वयंपाक अतिशय शांतपणे आणि कुठेही आवाज ना होता ती सहज पणे करत असे. जणू काही जादुई छडी होती तिच्या कडे.
तिच्या केलेल्या प्रत्येक पदार्थाची चव आणि कधीच कमी ना पडलेला स्वयंपाक पाहता तिला साक्षात अन्नपूर्णेचा वरद हस्त लाभला होता असंच वाटते .
कधी ही तिच्याकडे गेल्यावर नैवेद्याचे वाटीभर श्रीखंड ,बासुंदी ,खीर काहीतरी नक्की तयार असे. ती कणकेचा शिरा किंवा साबुदाण्याची खिचडी बनवायला लागली की सुवास,अंगणाच्या बाहेर पर्यंत दरवळत असे .
तिची जर जीवन यात्रा पहिली तर आजही आश्चर्य वाटते.
तिचे वडील अमरावती मध्ये ब्रिटिशांकडे आर्किटेक्ट म्हणुन कामाला होते. ते पैलवान असून नियमित पणे व्यायामशाळेत जात आणि घरी येताना रोज बायकोला आवडतो म्हणुन बादलीभर ताजा खवा घेऊन येत असत. घरी खूप वर्दळ असल्यामुळे तो खवा सहज संपत असे.पण बादलीभर खवा हे ऐकूनच आम्हांला फार गम्मत वाटे. मोठी आई फारच लहान असताना आई वडील अचानक गेले. मग तिला आणि तिच्या मोठ्या बहिणीची काळजी घ्यायला तिची मावशी जी दत्त महाराज सेवेत अनेक वर्ष गाणगापूर मध्ये व्यग्र होती, ती आली. तिने त्यांचे सगळ्या प्रकारच्या संकटातून रक्षण करीत प्रेमाने सांभाळ केला. त्यांना ती सुट्टीत गाणगापूर ला घेऊन जात असे. त्यामुळे भक्ती कशी हे लहानपणापासुनच तिने पहिली होती. मावशी तिला काही काम करू देत नसे . स्तोत्रं नामस्मरण करीत ती स्वयंपाक करीत असे. स्वतःच्या भाकरी मधला एक चतुर्थांश गाईला, एक भिकाऱ्याला, एक कुत्र्याला आणि एक स्वतःला अशी ती जेवत असे.
हेच संस्कार मोठी आई वर झाल़े आणि ती सुद्धा सगळा स्वयंपाक नामस्मरण करीत करत असे.त्यामुळे त्यातून तसेच भाव पोचतात असे ती म्हणत असे.
सोळाव्या वर्षी तिचे लग्न आजोबांशी झाले. ते पोलिस डिपार्टमेंट मध्ये होते.स्टेशन च्या जवळच घर असल्याने तिथल्या दोन शिपयांनी तिला भरपूर लोकांचा स्वयंपाक करायला शिकवला आणि काही महिन्यातच ती तरबेज झाली.
आजोबा फार लवकर तिला हार्ट अॅटॅक मुळे सोडून गेले. पाच मुलांचा संसार आणि पैश्यांची चणचण. पण तरी तिने कधी ही चेहर्यावर ते येऊ दिले नाही .सगळ्यांचा आदर सत्कार तिने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पर्यंत तसाच केला.
हे जरी वाचायला किंवा ऐकायला अविश्वसनीय वाटत असले तरी आम्हांला हे गुण सगळे पाहून अनुभवता आले ह्याची धन्यता वाटते .
ती जेव्हा देवघरात मस्त पदार्थ नैवेद्य साठी बनवून कृष्णासाठी भजन गात असे," आता फराळ करा तुम्ही श्रीकृष्णा" तर वाटे तो खरंच तिथे आला आहे की काय ..
अश्या अनेक सुंदर आठवणी आहेत ज्या जरी खाण्याशी निगडित असल्या तरी माणूस म्हणुन ती किती अद्भुत होती हे जाणीव करून देतात.
आमचे बालपण समृद्ध केले आणि आम्हाला आठवणींचा साठा दिला.आज ही कोणता ही पदार्थ बनविताना तिची आठवण येण्या वाचून रहात नाही.तिच्यासारखे सगळे पदार्थ बनवायचे कौशल्य नसले तरी तिचा आशीर्वाद कायम आहे हे जाणवत राहते.
आज तिच्या पुण्यतिथीला तिला मनापासून शतशः नमन 🙏
Comments