top of page

MadhuraWrites

दीप अमावस्या


आज दीप अमावस्या .ह्या दिवशी घरातील सगळे दिवे शोधून, स्वच्छ घासून, चमकावून एकत्र ठेवायचे आणि लावायचे व नंतर रांगोळी काढून,फुलं वाहून दिव्यांची पूजा करायची अशी प्रथा आहे.


श्रावण महिनाच्या पहिले ही अमावस्या येते व ह्या दिवशीच्या दीप पूजनाने श्रावण महिन्याचे स्वागत होते.अश्या विविध प्रथा कश्या सुरू झाल्या आणि पिढ्यानपिढ्या कश्या जपल्या गेल्या हे एक कोडेच आहे. पण, मला असे वाटते की त्यातून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखे नक्कीच आहे.


दिव्यांसारखी आपली विचारधारा सुद्धा आपण अधून मधून स्वच्छ केली तर आपले बरेच गैरसमज, गोंधळ दूर होतील व आपण नव्याने चांगले विचार करून नवीन सुरुवात करू शकतो, नवीन दृष्टीने गोष्टींकडे पाहू शकतो व परिस्तिथी नेमकी काय खुणावते हे समजू शकते.


ह्या दिवशी जसे आपण सगळे दिवे एकत्र करून प्रकाश एकाग्र करतो तसे जर विचार एकाग्र केले तर आयुष्याला एक चांगली दिशा मिळू शकते. राग, द्वेष, हव्यास, नैराश्य अश्या अनेक अंधकार पसरविणाऱ्या भावनांचा नाश होऊन एक सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आपण घेऊ शकतो.


प्रत्येक दिवा लावतांना एक एक वाईट विचाराचा त्याग करीत एक एक चांगला गुण अंगीकारला तर आयुष्याचे सार्थक होणे अशक्य नाही.


बाह्यांगाने आपण जसे सगळे सण साजरे करतो तसेच अंतरंगात ही ते रुजवले तर त्या सणांचा हेतू खर्या अर्थाने साध्य होईल.



36 views

1 Comment


Rajiv Abhyankar
Rajiv Abhyankar
Jul 18, 2023

Very nice

Like

Recent Posts

bottom of page