top of page

MadhuraWrites

मायबोली (Mayboli)


काही दिवसांपूर्वी माझे आईवडील नागपूरहून इथे आले होते भेटायला. एकदिवस मला दादर ला काही काम होते तर मला वाटलं त्यांना ही घेऊन जाऊ ,त्यांना खरेदीचा आनंद पण मिळेल. आई ला सगळ्यांत जास्त होणारा आनंद म्हणजे तिथलं मराठी पुस्तकाचं दुकान. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की किंडल वर ( kindle नावाचा पुस्तक वाचनाचं app आहे )वाचत जा तरी ती त्या दुकानात गेली आणि नवीन बरीच पुस्तकं घेऊन आलीच.घरी आल्यावर जेव्हा मी ती पुस्तकं हातात घेतली तेव्हा जो आनंदाचा अनुभव आला तो किंडल वर वाचण्यात कित्येक वर्षात मी अनुभवलेला नाही..माडगूळकर, श.ना.नवरे ,अरुणा ढेरे..जुने पुस्तके पुन्हा प्रकाशित ..असे नवीन पुस्तकं वाचनाची गम्मत निराळीच पण त्याहून ही ती जुनी असली तरी त्यातील मजकूर हा किती सुंदर आणि हृदयस्पर्शी हे वर्णन करणे फारच अवघड.


माझ्या मुलीला शाळेत मराठी हा विषय अनिवार्य आहे.काल तिचा मराठीचा अभ्यास घेत असतांना वाटलं की तिला मराठी शब्दांचा अर्थ इंग्लिश मधून समजवावा लागतो ह्यातच किती दयनीय परिस्थिती झाली आहे ह्याचा अंदाज येतो ..तरी आमच्या घरी दोन भाषा एकत्र करून बोलणे आम्ही शक्यतोवर टाळतो आणि मराठी बोलण्याचा आग्रह असल्यामुळे तिचं बोलणं बर्‍यापैकी शुद्ध आहे ह्यांच समाधान वाटते.


माझं पूर्ण शिक्षण इंग्लिश माध्यामातून झालं .इयत्ता नववी मध्ये असतांना कुठल्यातरी लोकप्रिय समाचार पत्राने मराठीत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. मला नेहमीच वक्तृत्व स्पर्धेत जाण्याचा उत्साह असायचा..नेमका ह्यावेळी ती स्पर्धा मराठीत आहे हे कळालं आणि मी जाम घाबरले .पण शिक्षक काही ऐकायला तयारच नव्हते आणि शेवटी मी पोचले तिथे मनापासून तयारी करून .घाबरत घाबरत का होईना अंतिम फेरी पर्यंत पोचले आणि उपविजेता झाले..एक वर्षानी बोर्डात अशी परिस्थिती नको म्हणुन मन लावून मराठीचा अभ्यास करु लागले.

सुदैवाने माझ्या आईला वाचनाची अत्यंत आवड असल्यामुळे वाचनालय मधून निरनिराळे मासिक, कथासंग्रह, कादंबर्‍या नियमित पणे घरी यायचे..मग प्रत्येक सुट्टी मध्ये इंग्लिश च्या बरोबरीने मराठी वाचन ही सुरू केले ..अकरावीत दोन नवीन मैत्रिणी गौरी आणि राधिका बनल्या आणि दोघींना मराठी वाचनाची आधीपासून आवड होती..त्यांच्याकडून बरेच लेखक आणि पुस्तकांची माहिती मिळायची ..आम्ही तिघी वाचनालयाचा भरपूर उपयोग करायचो..पुढे CA च शिक्षण झाल्यावर वाचनाची आवड कायम जोपासली गेली आणि त्या मुळेच लेखनाची पण ..मराठी हिंदी मध्ये मागच्या काही वर्षात लिहायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आले की भाषा समृद्ध असणे फारच गरजेचे असते.मात्रांचा गोंधळ अजून ही होतो पण प्रयत्न मनापासून सुरू ठेवला आहे.


भावना पोचवणं ही एक कला असून शब्दांची निवड आणि त्यांची रचना हे सहज पणे जमणे हे वाटते तितके सोपे नसून बराच अभ्यास असावा लागतो. इंग्लिश मध्ये ज्या वेगा ने विचार मनात येतात त्याच वेगात ते मांडताना कळत देखील नाही ह्याचे कारण वयाच्या तिसऱ्या वर्षापासुन इंग्लिश मध्ये घेतलेले शिक्षण. घरातील सगळेच मराठी बोलत असल्यामुळे, मित्रमैत्रिणी हिन्दी आणि संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणुन चार ही भाषा शिकायला मिळाल्या. पण आज इंग्लिश हीच सगळ्यात सोयीस्कर मोड ऑफ कम्युनिकेशन म्हणुन प्रस्थापित झाली आहे.


मध्यंतरी एका क्लायंट कडे फैक्ट्री मध्ये सर्व कर्मचारी मराठी आहे हे समजल्यावर मी साहजिकच मराठीत त्यांच्याशी संवाद साधला.इंग्लिश कठीण म्हणुन कधी ही न बोलणारे कर्मचारी सुद्धा मीटिंग्स मध्ये उत्साहाने भाग घेऊ लागले..हे मॅनेजमेंट ला जरी खूप पटले नसले तरी माझं म्हणणं एवढच होतं की ज्याप्रांतात आहोत त्याची भाषा का नाही आणि ते ही जर सकारात्मक परिणाम देणारं ( positive outcome ) आहे हे दिसत असताना सुद्धा इंग्लिश किंवा हिंदीचा अट्टाहास का बरं .जैसा देस वैसा भेस हे मी लहानपणीच शिकले..माझे वडील ज्या ज्या प्रांतात कार्यरत होते तिथली भाषा त्यांनी आत्मसात केली तामिळ असो वा गुजराती ..त्यामुळे त्यांना सगळ्यांशीच संवाद साधणे आज देखील सोपे वाटते .


आज बस, लॉबी, पार्क, शाळा कॉलेज शिकवणी वर्ग सगळीकडे फक्त इंग्लिश भाषेचा प्रयोग दिसतो..मला स्वतःला ह्या भाषेचं फार प्रेम आहे पण जेव्हा घरी पण मराठी लोकांना इंग्लिश मध्ये बोलतांना बघते तेव्हा कुठे तरी खंत वाटते.


आताची आणि येणारी पुढची पिढी ही किती मोठ्या सुखाला मुकणार हा विचार मनात राहतो.शाळेतले मराठी पुस्तक अत्यंत कष्टाने वाचणारे हे मुलं कधी मराठी कथा संग्रह, लेख,आत्मचरित्र, कविता-संग्रह वाचतील का ?

त्यात काय दडलय हे OTT वर इंग्लिश सिरीज पाहणार्‍या किंवा kindle वर इंग्लिश वाचन करणार्‍या ह्या पिढीला कसं समजवणार ?


आपल्या मातृभाषेतून जो ओलावा मिळतो, मायेची जी ऊब अनुभवता येते ती इतर कुठल्या ही भाषेतून शक्य होणे अवघड.

मोठे होऊ लागलो की आजोळची आठवण येते तसेच वाचलेल्या पुस्तकांची आणि गोष्टींची पण .ही आठवण फक्त इंग्लिश पुरता सीमित राहू नये ह्याची आपण सगळ्यांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.


Ott, सिनेमा गृहात,नाट्य मंदिरात अधून मधून मराठी कार्यक्रम सिनेमे नाटकं सहपरीवार आवर्जून बघावे. मराठी जुने नवीन गाणे ऐकावे. एखादं पुस्तक मिळून वाचावे..असे सोपे प्रयत्न शक्य आहेत असे मनापासून वाटते .


सगळ्याच भाषा सुंदर आणि वैशिष्टय़ पूर्ण असतात .आपली मातृभाषा असल्यामुळे तिला जोपासून समृद्ध ठेवणे ही आपली जबाबदारी निश्चितच आहे.नाही का?



Komentarze


Recent Posts

bottom of page